अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडविली आहे. ‘पडळकर यांचे वक्तव्य योग्य आहे का हे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या नेत्यांनीच तपासून सांगावे.
त्यांना हे पटत असेल तर प्रश्नच संपला’, असेही रोहित पवार म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका, त्यानंतर पडळकर यांच्या गाडीवर झालेली दगडफेक,
त्यातील हल्लेखोर राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचा पडळकरांचा आरोप या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले, ‘पडळकर यांनी जे वक्तव्य केले आहे. ते कोणालाही विचारले तरी चुकीचे असल्याचे सांगतील.
आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. मात्र, पडळकरांना हे कोण सांगणार? त्यांना आमदारपद पवारांवर टीका करण्यासाठीच देण्यात आलेले आहे.
त्यामुळे त्यांना पाठिशी घालणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच एकदा पडळकर यांच्या या वक्तव्यावर विचार करावा, ते योग्य आहे की अयोग्य हे त्यांनीच सांगावे. पडळकर एवढ्या खालच्या भाषेत टीका करीत आहेत,
की त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्यालाही त्या पातळीवर जावे लागेल. तसे झालं तर लोक आपल्यालाच नावे ठेवतील.
]त्यामुळे त्यांना उत्तर देण्याच्या खटपटीत कोणी पडत नाही. त्यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा दोन दगड घेऊन ते एकेमेकांवर आपटले तर त्यातून आग निर्माण करण्याचे तरी काम होऊ शकेल’, अशा भाषेत पवार यांनी पडळकरांची खिल्ली उडवली.