आमदार रोहित पवार म्हणाले यापुढे फक्त ‘असेच’ राजकारण करणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-भक्ती बरोबर विचारांची शक्ती आणि उपस्थित असणारी लोकशक्ती यांना साक्षी ठेवून मतदारसंघात विकासाचे काम करायचे आहे. आपल्याला आगामी काळात फक्त विकासाचे आणि विकासाचेच राजकारण करायचे आहे.

त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कर्जत तालुक्यासाठी हक्काचे ५० बसेस उपलब्ध होणार असून यापुढे एसटी नसल्याने मतदारसंघातील कोणाला शिक्षण सोडावे लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

कर्जत बसस्थानक परिसरात ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज रथ व रथोत्सव प्रतिकृती लोकार्पण व कर्जत बस डेपो आगाराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी बारामती अॅग्रोचे विश्वस्त राजेंद्र पवार, सुनंदा पवार, सुभाष गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, श्याम कानगुडे, मेघराज पाटील, पुजारी पंढरीनाथ काकडे यांच्यासह रथोत्सव पुजारी, मानकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विभाग नियंत्रक विजय गिते म्हणाले, सर्वाधिक विद्यार्थीवर्ग कर्जत तालुक्यातील एसटीने प्रवास करीत आहे. कर्जत आगाराने त्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. आज राज्यातील २५१ आगाराचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते पार पाडले याचा अभिमान आहे.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, बबन नेवसे, भालचंद्र कुलथे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. विशाल मेहत्रे यांनी केले. आभार विजय गिते यांनी मानले. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,

गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सार्वजनिक बांधकामचे अमित निमकर, के. के. थोरात कन्स्ट्रक्शनचे प्रशांत फलके, बापूसाहेब नेटके, मनीषा सोनमाळी, डॉ. शबनम इनामदार, शीतल धांडे, स्वाती पाटील, अशोक जायभाय, सुनील शेलार, नाना निकत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांचे आई आणि वडील तथा बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार हे व्यासपीठावर विराजमान न होता सर्वसामान्य नागरिकांमध्ये बसलेले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24