अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समारोपाचा कार्यक्रम येथील माऊली सभागृहात रविवारी झाला.
यावेळी खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर मालन ढोणे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले कि, राज्यात भाजप -राष्ट्रवादीत टोकाचा वाद सुरू असताना नगरमध्ये मात्र सहमतीचे राजकारण सुरू आहे. मात्र हे जनतेच्या फायदेसाठीचे मनोमिलन आहे.
तसेच विकास कामांचे सादरीकरण करताना आमदार साहेब तुम्ही फोटोत दिसत नाहीत, पण नाराज होऊ नका, असे सांगून आम्ही फोटोत एकत्र येत नाही, त्यामागे काही अडचणी आहेत, असा उल्लेख विखे यांनी आवर्जून केला .
राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळेच आज विकास कामांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
पुढचा महापौर महाविकास आघाडीचा असेल. पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या कामांचे सादरीकरण आमदार संग्राम जगताप करतील, असेही विखे म्हणाले.