अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मुख्य बाजार हा नेप्तीच्या उपबाजारात हलविण्याचा शहराच्या आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव शिजत आहे. यामुळे व्यापारी, हमाल, मापाडी, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक हे रस्त्यावर येतील.
काँग्रेस हे कदापि होऊ देणार नाही. त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी बाजार समितीवर बुलडोजर फिरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या नीच कृत्याला आडवा पाय घालत विरोध करण्याचे काम मी करणार आहे, अशी जाहीर भूमिका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी घेतली आहे.
बाजार हलविण्यास शहराच्या अर्थचक्रावर याचे अन्यथा दूरगामी नकारात्मक परिणाम होतील. यामुळे शहराचे नुकसान होऊ नये यासाठी काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. पहिल्यांदाच काळे यांनी बाजार समितीतील या विषयामध्ये जाहीर भाष्य केले आहे.
आयटी पार्क पोल-खोल प्रकरणा नंतर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे आधीच शहरातील राजकीय वातावरण तापले असताना आता बाजार समितीतील व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या पाठीशी काँग्रेसच्या माध्यमातून उभे राहण्याची किरण काळे यांनी भूमिका घेतल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.
किरण काळे यांनी म्हटले आहे की, बाजार समिती जरी तालुक्याचा विषय असला तरी देखील त्या ठिकाणी व्यापार करणारे बहुतांशी व्यापारी, हमाल, मापाडी हे नगर शहरातील आहेत. नगर शहरातील प्रत्येक घटकाचे हित जोपासणे ही शहर काँग्रेसची जबाबदारी आहे.
भुसार बाजार, भाजीपाला बाजार, फळ बाजार, फुलबाजार, चिंच बाजार, मिरची मार्केट या ठिकाणी शेकडो व्यापारी, हमाल, मापाडी आपलं पोट भरतात. मात्र आमदारांना त्यांच्या सोयऱ्यांच्या मदतीने हा बाजार बुलडोझर लावून जमीनदोस्त करत या सगळ्यांना नेप्ती उपबाजारात हलवायचं आहे.
यातून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्याचा यांचा डाव आहे. नेप्तीला कांदा बाजार असून त्याठिकाणी आज देखील गाळे विकले गेलेले नाहीत. यामुळे मोठ्या संख्येने ग गाळे आजही रिकामे आहेत. मुख्य बाजार समितीतील व्यापाऱ्यांना तिकडे जायला भाग पडून तिकडचे रिकामे गाळे विकून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटण्यासाठी यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.
मुख्य बाजार समिती आवारातील गाळ्यांवर बुलडोजर चालवून याठिकाणी परत नवीन गाळे बांधायचे. हे गाळे घेण्यासाठी बाजारात आपल्या पंटर लोकांना एजंट म्हणून सोडायचं आणि यातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्याचा या मंडळींचा डाव आहे, असा घणाघाती आरोप किरण काळे यांनी केला आहे.
दूध संघावर यांचीच सत्ता होती. त्यांनी ती संस्था दिवाळखोरीत जाणीवपूर्वक काढून गिळंकृत केली. ऐन मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या झोपडी कॅन्टीन येथील दूध संघाच्या जागेत असाच कोट्यवधी रुपयांचा मलिदा यांनी लाटला. तोच डाव आता बाजार समितीत सुरू आहे.
यामुळे व्यापारी भयभीत असून दडपशाहीमुळे ते आज उघडपणाने यावर भाष्य करण्यासाठी घाबरत आहेत. त्याचाच गैरफायदा ही मंडळी उठवत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
📌 राज्य शासनाने काढलेल्या नोटिसीचे स्वागत :
शासनाच्यावतीने बाजार समितीतील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर झाला असून शासनाने बाजार समिती बरखास्त का करू नये याबाबत काढलेल्या नोटीस बद्दल किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने स्वागत केले आहे.
नगर तालुका महाविकास आघाडीच्या संघर्षाचा हा विजय आहे. सोयऱ्या, धाय-यांच्या जहाजाला आता भगदाड पडले असून आपले पितळ उघडे पडू नये त्यासाठी ते सैरभैर झाले आहेत. म्हणून त्यांच्या मुंबई वाऱ्या सातत्याने सुरू आहेत.
पण आता वेळ गेलेली आहे, असे सांगत किरण काळे यांनी शहर जिल्हा काँग्रेस ही देखील आता नगर तालुक्यातील महाविकासआघाडी सोबत असल्याचे जाहीर केले आहे.
📌 अनधिकृत गाळ्यां संदर्भात आयुक्तांची भेट घेणार :
बाजार समितीतील अनधिकृत गाळे पाडण्याचा आदेश यापूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे आयुक्त असताना त्यांनी दिला आहे. याबाबत बाजार समितीने रिवाईज प्लॅन मंजुरीसाठी सादर केला होता.
तो देखील फेटाळण्यात आला आहे. असे असले तरी देखील अजूनही अनधिकृत गाळे पाडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आयुक्त का करत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
नगर शहर शिवसेनेने अनधिकृत गाळ्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेला शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे काळे यांनी जाहीर केले आहे. या मुद्यावरून शहरात पुन्हा एकदा काँग्रेस व शिवसेना एकत्र आल्यामुळे आमदारांची मात्र कोंडी झाली आहे.