अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे तर ग्रामीण भागात कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी डीपीच बंद केले जात आहेत.
या पार्श्वभूमिवर आता राजकीय पक्ष आक्रमक पवित्रा घेतना दिसत आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील सर्व शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसेच्या वतीने सुपा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान विद्युत पुरवठा खंडित न करता वीजबील वसूल केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो.
शेतकर्यावर होणार्या अन्यायाविरोधात सोमवारी (दि. 1) अहमदनगर-पुणे महामार्गावरील सुपा चौकात आंदोलन करण्यात आले. महावितरणकडून होणार्या बंद वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बांधवांचे होणारे शेतमालाचे नुकसान कांदा, गहू, हरभरा, कलिंगड, काकडी व जनावरांचा चारा सुकून गेला आहे.
शेतकरी बांधवांची पिळवणूक केली जात असल्याचे सांगत डी. एन. साबळे यांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अभियंता आडभाई म्हणाले, महावितरण शेतकर्यांसाठी वीज बिलाबाबत सवलत देणार आहे. यात शेतकर्यांनी भरलेल्या वीज बिलातून ग्रामपंचायतीला 33 टक्के रक्कम मिळणार आहे.
या रक्कमेतून गावपातळीवर विद्युत तारा, पोल यासह ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करता येणार आहे. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत पुरवठा खंडित न करता वीजबील वसूल केले जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.