पांगरमल मध्ये मॉबलिंचिंग ! चोर समजून चौघांना बेदम मारहाण ; एकाचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

नगर तालुक्यातील पांगरमल गावात गुरुवारी रात्री शेळी चोर समजून ग्रामस्थांकडून चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत एका जणाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून विद्यमान सरपंचासह इतर २५ ते ३० ग्रामस्थांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पांगरमल गावात गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. त्या पार्श्वभूमीवर पांगरमल ग्रामस्थांच्या वतीने बुधवार (दि.३) रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते.

गुरुवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास शेळी चोर समजून ग्रामस्थांनी चौघा जणांना बेदम मारहाण केली. पांगरमल गावातील लोकांनी कुऱ्हाड, कोयता तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीत चांगदेव नामदेव चव्हाण (वय २५ रा. पखोरा, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला शालिका रमेश चव्हाण (वय ३० रा. पांगरमल ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विद्यमान सरपंच अमोल आव्हाड, महादेव आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, आजिनाथ महादेव आव्हाड व नाव माहीत नसलेल्या दोघांसह गावातील इतर अनोळखी २० ते ३० लोकांविरुद्ध (सर्व राहणार पांगरमल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत फिर्यादी शालिका चव्हाण, मुलगा रामलाल चव्हाण तसेच चोर म्हणून पकडण्यात आलेला इसम जखमी झाले तर चांगदेव चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे

चोर म्हणून पकडण्यात आलेला इसम हा फिर्यादी कुटुंबातील नातेवाईक असल्याच्या संशयावरून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून सुमारे दहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनी भेट देऊन तपासा बाबत सूचना दिल्या. एमआयडीसी पोलिसांच्या वतीने पांगरमल गावामध्ये गस्त घालून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

गावातील अनेक तरुण फरार
पांगरमल गावातील अनेक तरुण अटकेच्या भीतीपोटी मोबाईल बंद करून फरार झाल्याचे चित्र गावात पहावयास मिळत आहे. गावामध्ये शुकशुकाट दिसून येत असून शांतता आहे.

विद्यमान सरपंच तसेच माजी सरपंच आरोपी
सदर घटनेमध्ये पांगरमल गावचे विद्यमान सरपंच अमोल आव्हाड तसेच माजी सरपंच तथा जेऊर गणातील माजी पंचायत समिती सदस्या यांचे पती महादेव आव्हाड यांचा आरोपीमध्ये समावेश आहे

Ahmednagarlive24 Office