अहमदनगर जिल्ह्यात मोबाइलचे दुकान फोडून दहा लाखांचा माल लंपास !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर शहरातील नेवासे रोडवर बसस्टॅण्ड जवळील हॉटेल राधिका शेजारी असलेले कासलीवाल यांचे श्रेया मोबाइल शॉप हे दुकान शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास चोरट्यांनी फोडून तेथील सुमारे ७ ते ८ लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरुन नेले. तसेच गल्ल्यातील सुमारे अडीच लाखाची रोकड चोरून नेली.

पहाटे ४ पासूनच बसस्थानक व रेल्वे स्टेशन असल्याने नागरिकांची वर्दळ सुरू असते. अशा ठिकाणी चोरट्यांनी हे मोबाईल दुकान फोडले आहे. श्रेया मोबाईल शॉपी या दुकानचे शटरचे कुलूप तोडून एक चोरटा दुकानात घुसला तर बाहेर तीन ते चार चोरटे उभे होते. सर्व चोरट्यांनी तोंडाला मास्क लावलेले होते.

त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखू येत नव्हते. एका चोरट्याने तोंडात बॅटरी धरुन दुकानातील मोबाइल प्रत्येक खोके उघडून त्यातील मोबाइल पाठीवर सॅकसारख्या दोन पिशव्यांमध्ये भरून हे सर्व वेगवेगळ्या कंपनीचे नवे मोबाइल चोरून नेले. त्याची किंमत अंदाजे ६ ते ७ लाख रुपये आहे.

हे दुकान व्यापारी जितेंद्र रूपचंद कासलीवाल यांचे आहे. भर बाजारपेठेत पहाटेच्यावेळी चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. किती माल गेला याची जुळवाजुळव सुरू होती. दुकान चालक जितेंद्र रूपचंद कासलीवाल यांनी सांगितले की, लाखापर्यंत मोबाईल चोरून नेले.

काल कर्मचारी कमी असल्याने भरणा करायचा राहिला असल्याने लाखाहून जादा रक्कम होती. त्याची मोजदाद सुरू असल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24