अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आधीच नगर शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे. हे रस्ते दुरुस्त करता करता वर्षे जाते. जे रस्ते चांगले झाले आहे, नेमके त्याच ठिकाणी काहीतरी खोदकाम सुरु असते.
यामुळे नियोजनाच्या अभावामुळे व्यवस्थित असलेल्या रस्त्याची देखील लवकरच दुर्दशा कशी होईल यासाठी प्रयत्न केले जातात…. मॉडेल रस्ता….नुकतेच सावेडी उपनगरातील उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी, प्रोफेसर चौक, कुष्ठधाम, सोनानगर, श्रमिकनगर, भिस्तबाग चौक,
गजराज फॅक्टरी ते ऐतिहासिक भिस्तबाग महाल पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम प्रस्तावित आहे. मात्र महापालिकेने केलेल्या डांबरीकरणावर महावितरणने जेसीबी चालवला आहे, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने चर खोदला आहे.
महापालिकेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील रस्त्याचा असा खेळखंडोबा झाल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सुमारे ३ कोटी १० लाख रुपये खर्चून सदर रस्त्याचे काम करण्यात येत आहे. रस्त्यांच्या कामाचे नियोजन करताना गटारी, भूमिगत केबल, जलवाहिनी टाकणे ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर शेवटी डांबरीकरण करावे, अशी कामाची पद्धत आहे.
परंतु , सावेडीच्या मॉडेल रस्त्याचे झाले असे की, आधी डांबरीकरण आणि नंतर केबल, जलवाहिनी आणि नळ जोडणी, अशा उलट्या क्रमाने काम करण्यात येत आहे. रस्ता वापरात येण्याआधीच दोन्ही बाजूने उखडला गेला असून, डांबरीकरणावर केलेला दहा लाखांचा खर्च अक्षरश पाण्यात गेला आहे.
महापालिकेतील प्रमुख आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातून हा रस्ता जात असून, त्यांनीही हा रस्ता मॉडेल रस्ता करणार असल्याचे वेळोवेळी भाषणातून सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचा खेळखंडोबा झाला असून, त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.