बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सून हा कोकणातच रखडलेला असून तो लवकरच वेग घेईल अशी माहिती हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
सध्या मान्सून वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून चक्रीवादळ आता पुढे सरकल्याने मान्सूनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती हवामान खात्याच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने दिली आहे.
महाराष्ट्रात या तारखेपासून होईल पावसाची सुरुवात
भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी देखील या संदर्भात ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 23 जून पासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असून 24 ते 25 जून पर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
याबाबत हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर 22 ते 23 जून नंतर मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 जून नंतर सर्व ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आधीच पाऊसाला उशीर झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडले आहेत. परंतु आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सर्वत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
तसेच आज नासिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड तसेच सोलापूर, लातूर, नांदेड, जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यात तर गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
या राज्यांमध्ये 26 जून पर्यंत कोसळणार पाऊस
उष्णतेच्या लाटेपासून लोकांना दिलासा मिळवून देत भारतीय हवामान विभागाने आता पुढील पाच दिवसात देशाच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून 23 जून पासून पूर्व भारत आणि मध्य भारताच्या लगतच्या काही भागात उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असून 24 ते 25 जून रोजी पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, ईशान्य भारतात आणि उप- हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दोन दिवस खूप मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस देशातील हवामानाचा अंदाज
येणाऱ्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून 22 जून रोजी उप हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम मेघालय मध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 22 जून रोजी बिहार आणि झारखंड मध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून 22 आणि 23 जून रोजी गंगा पश्चिम बंगाल आणि 22 ते 26 जून दरम्यान ओडिशा आणि 23 आणि 24 जून ओडिसा राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.