अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भाजपचे बीड, लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि.२८) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, कोरोनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, ऊसतोड कामगारांसाठी कायदा बनवावा या मुद्यांकडेही मोर्चातून लक्ष वेधले जाणार असल्याची
माहिती धस यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार धस म्हणाले की, मराठा समाजाच्या अारक्षणासाठी शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
या सुनावणीला ज्येष्ठ विधिज्ञ शासनाने नियुक्त करावेत अशी मागणी आहे. समाजाच्या आरक्षणासाठी सोमवारी निघणाऱ्या मोर्चाला भाजप पक्षानेही पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६०० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी अवघे ८ टक्के कर्जवाटप झाले होते. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे मुदत ठेवीत ठेवले आहेत.
पीक विम्याच्या ‘बीड पॅटर्न’ची चर्चा असली तरी शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. हा उलटा पॅटर्न सुरू असल्याची टीका आमदार धस यांनी केली.