दरड कोसळण्याच्या घटनेत शंभराहून अधिक ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-महाराष्ट्रात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ७३ मृतदेह काढण्यात आले असून ४७ जण अजूनही बेपत्ता आहेत, असं नॅशनल डिजास्टर रेस्पॉन्स फोर्सचे महासंचालक प्रधान म्हणाले. शंभराहून अधिक जण ठार झाले आहेत.

तळीयेतून ४४ मृतदेह बाहेर :- रायगड जिल्ह्यातील तळीये गावातून सर्वाधिक ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रात दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली. तसंच महाराष्ट्रात पाऊस आणि पूरस्थितीत मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजूनही बचावकार्य सुरू :- रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्यात अजूनही बचावकार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हे तीन जिल्हे मिळून अजूनही ४७ जण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या ३४ टीम तैनात आहेत. या टीम रायगडमधील तळीये, रत्नागिरीतील पोरसे आणि साताऱ्यातील मीरगाव, आंबेघर आणि ढोकवाळे या गावांमध्ये या टीम तैनात आहेत, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

४९ पथके बचावकार्यात :- महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या ‘महाराष्ट्रात एनडीआरएफच्या तब्बल ३४ टीम्स मदत आणि बचावकार्य काम करत आहेत, तर कर्नाटकमध्ये ७ आणि तेलंगणमध्ये आठ टीम मदत आणि बचावकार्य करत आहेत’, अशी माहिती त्यांनी दिली.

दरड कोसळून ११२ जणांचा मृत्यू :- पावसामुळे पुणे आणि कोकण विभागात दरड कोसळून ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रायगड जिल्ह्यातील ५२ जणांचा समावेश आहे. पाऊस आणि पुरामुळे राज्यात आतापर्यंत १,३५,३१३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

यात सांगली जिल्ह्यातील ७८, १११ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ४०,८८२ नागरिकांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला तर कोल्हापुरात पंचगंगेला पूर आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24