अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यातील १ लाख १२ हजार नागरिकांनी पहिला, तर १८ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
असे एकूण १ लाख ३० हजार डोस आतापर्यंत संपले आहेत. देशभर १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, महसूल, पोलीस तसेच इतर फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली.
त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक, तसेच ज्यांना व्याधी आहे. अशा ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरू झाली.
कोरोनाची ही लस जिल्ह्यातील ११८ सरकारी, तर ३३ खासगी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात १४ ग्रामीण रुग्णालये, ८ महापालिकेची रुग्णालये, तसेच ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश असून, येथे मोफत लस देण्यात येत आहे. याशिवाय ३३ खासगी रुग्णालयात २५० रुपयांना लस दिली जात आहे.