अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… आईएवढे नीयस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती या जगात नाही. अशा थोर जन्मदात्या माऊलीला पोटच्या मुलाने घरातून बाहेर हाकलून दिल्याची लाजीरवाणी घटना राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे घडली.
दरम्यान हातपाय थकलेल्या या वयोवृद्ध आईने पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलिसांना सांगितली. याबाबत अधिक माहिती अशी कि,
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील मित्र परिवार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय अनुसया सीताराम डोळस हि महिला तिचा मुलगा संदीप, सून व नातवंडासह राहत होती.
मार्च महिन्यात घरगुती कारणावरून आई व मुलामध्ये भांडण झाले. तेव्हा मुलाने आईला घरातून बाहेर हाकलून दिले.
गेल्या दोन महिन्यांपासून वयोवृद्ध आई परिसरातील ओळखीच्या लोकांकडे राहून हलाखीचे जीवन जगत आहे. दि. 29 मे रोजी त्या वयोवृद्ध आईने पोलिसांत धाव घेऊन पोलिसांना न्याय देण्याची विनंती केली.
अनुसया सीताराम डोळस या वयोवृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून तिचा मुलगा संदीप सीताराम डोळस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.