अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- कंटेंट ऑन डिमांड या सेवेअंतर्गत धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर (मोबाइल किंवा अन्य उपकरण) चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ असा प्रीलोडेड बहुभाषिक कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल. विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार आहे.
मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळेल, असं रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितलं. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) ही सेवा याच महिन्यापासून सुरू होणार आहे. ही सेवा 5 हजार 723 उपनगरी रेल्वेसह(लोकल) 8 हजार 731 ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या 5 हजार 952 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका एसी लोकलमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे. यात रेल्वे आणि रेलटेलमध्ये 50-50 टक्के महसूल विभागून घेतला जाणार आहे. पीएसयूला या प्रकल्पातून किमान 60 कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली.