अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-सहकारी तत्त्वावर चालवला जाणारा राहुरी कारखाना बंद पाडून त्याचे खासगीकरण करण्याचा डाव विरोधकांचा असून त्यासाठी येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधक निवडणूक लढवणार आहेतच; परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे,
तोपर्यंत त्यांचा हा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे अभिवचन डॉ. तनपुरे कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कारखान्याच्या सभासदांना दिले.
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने रविवार दि. २८ रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे होते.
यावेळी व्हाईस चेअरमन दत्तात्रेय ढुस, संचालक उदयसिंह पाटील, शामराव निमसे, बाळकृष्ण कोळसे, केशवराव कोळसे, महेश पाटील, मच्छद्रिं तांबे, अशोक खुरुद, मधुकर पवार, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, भारत तारडे, शिवाजी सयाजी गाडे,
सुरसिंगराव पवार, विजयराव डौले, नंदकुमार डोळस, अर्जुनराव बाचकर, सुभाष वराळे, हिराबाई चौधरी, पार्वतीबाई गोरक्षनाथ तारडे, कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अंबादास पारखे उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात मागील ३ वर्षात २५ सहकारी साखर कारखाने बंद पडून खासगीकरण करून ताब्यात घेतले. मात्र आपण राहुरीचे खासगीकरण होऊ देणार नाही. तनपुरे कारखान्याचे एप्रिल अखेरपर्यंत ऊसगाळप सुरू राहणार आहे,
ज्यांचं राहुरी कारखान्याला टिपरु जात नाही, त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार नाही. यंदा गाळपास अनेक अडचणी आल्या; परंतु सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्यामुळे दोन लाख टन ऊस गाळप आजअखेर पूर्ण झाले आहे.
जे लोक ग्रामपंचायतला निवडून येत नाही, ते माझ्यावर व संचालक मंडळावर आरोप करतात. राज्य सरकारच्या गृहखात्याच्या १०० कोटींच्या वसुलीचा ट्रेलर आपण पहिला आहे, मात्र महसूल खात्याची चौकशी झाली तर संपूर्ण पिक्चर दिसेल,
अशी टीका करून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्यातील शेतकरी दुधदर, नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असताना श्रीरामपुरात जाऊन दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देतात. प्रवेरेचे २५ कोटी रुपये राहुरी कारखान्याकडे आहेत,
ते कारखाना सुस्थितीत यावा म्हणून आम्ही खर्च केले आहेत, हे कोणी विसरू नये. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढे शांत संचालक मंडळ मला लाभले. त्यांनी मनमोकळेपणाने मला कारभार करू दिला.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी कारखान्यासाठी मोठी मदत केली असल्याचाही उल्लेख खासदार डॉ. विखे यांनी केला. ऑनलाइन मीटिंगमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले. त्यावर खा.सुजय विखे यांनी त्यांना उत्तरे दिली.
ऑनलाइन मीटिंगमध्ये तनपुरे कारखान्याचे संचालक मंडळ व सुजय विखे यांच्यावर टीका करणारे अमृत धुमाळही हजर होते. कोण आहेत ते, मी त्यांना ओळखत नाही, बोलायच का तुम्हाला, अशी विचारणा खासदार विखे यांनी केली.
काही वेळ वाटही पाहिली; परंतु अमृत धुमाळ एक शब्दही बोलले नाहीत. त्यानंतर खासदार विखे यांचे भाषण सुरू झाले.
त्यानंतर ऑनलाईन स्क्रीनवर अमृत धुमाळ परत दिसले नाही.कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब देशमुख यांनी अमृत धुमाळ यांनी आमच्या खोट्या सह्या करून कारखान्याच्या विरोधात अर्ज दिल्याचे स्पष्टीकरण दिले.