अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची दुसरी लाट राज्यासह देशभरात कमी होत असताना व सर्व निर्बध उठले असूनही अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढ कायम आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने पाचशे पेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळत आहेत याबाबत खा सुजय विखे यांनी त्यांचे मत मांडले आहे. अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधितांचे आकडे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी योग्यच आहे,’ असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे.
करोनासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा, लसीकरणाचे नियोजन यासंबंधी डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘मागील काही काळात नगर जिल्ह्यात जवळपास एक लाख तीस हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्याखालोखाल नगर जिल्ह्यात या चाचण्या झाल्या आहेत. ज्या धुळे जिल्ह्याला करोनामुक्त म्हटले जाते, तिथे केवळ आठ हजार चाचण्या करण्यात येत आहे.
जिल्ह्यात प्रशासनाने जास्तीत जास्त चाचण्या करून बाधितांना विलगीकरणात पाठविण्याचे धोरण राबवले आहे. त्यामुळे सध्या कागदावर आकडे वाढलेले दिसत असले तरी तो प्रशासनाच्या सकारात्मक कृतीचे निदर्शक आहे.
भविष्यात साथ नियंत्रणासाठी याचा उपयोग होणार आहे. जेवढे आपण अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांना बरे करू, तेवढी तिसरी लाट येण्याची शक्यता कमी राहील.’