खासदार सुजय विखे म्हणाले काळेबेरे केले त्यांनाच भीती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मुळा प्रवराचे ५० हजार बिगर थकबाकीदार सभासद मतदानासाठी पात्र असून इतर थकबाकीदार सभासदांनी थकबाकीची रक्कम भरली, तर त्यांनाही मतदान करता येईल.

शासनाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये सभासद रक्कम ५० रुपयांवरून २०० करण्यात आली. आता परत ती ५० रुपये करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सभासदांच्या मतदानाच्या हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही.

तर केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे सहकार जिवंत राहण्यास मदतच होणार आहे. ज्यांनी काहीतरी काळेबेरे केले आहे, त्यांना त्याची भीती वाटत आहे, असे प्रतिपादन मुळा प्रवराचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.

ते रविवारी मुळा प्रवरा कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, भाजपचे प्रकाश चित्ते आदी उपस्थित होते.

त्यांनी सांगितले त्यावेळी शासनाच्या नियमानुसार सभासद रक्कम २०० रुपये करण्यात आली. आता काही सभासदांनी ती रक्कम परत ५० रुपये करावी, अशी मागणी केली आहे. या बदलांमुळे येत्या निवडणुकीत सभासद मतदानापासून वंचित राहतील असा गैरसमज पसरवला जाऊ शकतो.

आपल्या कुटुंबाने सहकाराची मुहूर्तवेढ रोवली. त्यामुळे असे करणार नाही. उलट ज्यांच्याकडे मुळा प्रवराची थकबाकी आहे, त्यांनीही ती भरावी त्यांनाही मतदानात भाग घेता येईल. संचालक मंडळाची मुदत संपलेली असून निवडणूक घेण्याबाबत आपण आयोगाकडे मागणी केलेली आहे.

सहकारात कोणीही राजकारण करू नये. मुळा-प्रवरा वीज संस्थेला पुन्हा वीज वितरण करण्याचा परवाना मिळावा, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. येत्या काळात जेव्हा कधी निवडणूक होईल, तेव्हा आपण परत बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू.

महावितरणकडून मुळा प्रवरेला जे भाडे मिळते ते कायम ठेव खात्यात जमा होते. त्यांची रक्कम सुमारे ४० कोटी रुपये झाली आहे. कोरोना काळात जिल्हा सहायक निबंधक यांच्या परवानगीने अन्न छत्र चालवले. त्यासाठी ६५ लाख रुपये खर्च केले आहेत.

सहकाराचा अंत होऊ नये म्हणून आपण राहुरी व गणेश चालवायला घेतला. शेतकऱ्यांना खासगी कारखान्याचा अतिशय वाईट अनुभव आहे. त्यामुळे सहकार टिकलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24