अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई- मॅगझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (दि. २०) प्रदान करण्यात येणार आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संसद महारात्न पुरस्काराबरोबरच खा. सुळे यांना विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कारही याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला.
त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ८९ टक्के उपस्थिती लावत १२२ चर्चासत्रात भाग घेतला आहे.