खासदार व आमदारांनी रुग्णसेवेसाठी निधी द्यावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-आजपर्यंतचा कोरोना आजाराचा आकडा पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली. आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न करूनही दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत आहे.

यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून खासदार आणि आमदारांनी रुग्णसेवेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.

कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.

परंतु याबरोबरच कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी दक्ष रहाण्याचे आवाहन कोल्हे यांनी केले. देश, राज्य, जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. शेकडो पटीत वाढणाऱ्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.

कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी केली नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. संशयितांच्या तपासण्या होऊन चाचणीचा अहवाल मिळत नाही.

विलगीकरण कक्षाची सोय नसल्यामुळे रुग्ण घरीच थांबतात. घरे छोटी असल्याने कुटुंबातील इतरांच्या संपर्कात येत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी दाखल करून घेण्यासाठी बेडची सुविधा नाही.

गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची सुविधा नाही, आॅक्सीजन मिळत नसल्याने इतरत्र हलवले जाते. आर्थिक परिस्थितीने मृत्युला सामोरे जाण्याची वेळ येत अाहे. अनेक कुटुंबातील तरुणांच्या जिवावर बेतले.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांनाही बाहेरून औषधे आणावी लागत आहे. अनेकांना रुग्णांला जगवण्याबरोबर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लढण्याची वेळ आली.

या सर्व परिस्थितीचा विचार करता रुग्णांना सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. व्हेंटीलेटर, आॅक्सीजन, औषधे, विलगीकरण कक्ष, रुग्णांसाठी जागा मिळत नसल्याने रुग्णांच्या भावनांशी खेळ चाललाय, असेही कोल्हे म्हणाल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24