महावितरणच्या ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार पगारी रजा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता करणारे विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतले आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये वीजसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिमंडलस्तरावर समन्वय कक्ष सुरु करण्यासोबतच वैद्यकीय मदतीसह आर्थिक सहायता करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते.

त्याप्रमाणे महावितरणचे सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना काळात वैद्यकीय व आर्थिक सुरक्षा कवच देणारे परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे.

वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एकवेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची मान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून व स्वतः संपर्क साधत आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत २७ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यातही त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24