अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक ताबडतोब थांबवा. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सद्य परिस्थितीचा विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत.
अन्यथा नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत महावितरण कार्यालयात तीव्र आंदोलन करू. असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता कोपणर यांना दिला.
कोकाटे म्हणाले की, महावितरण कार्यालयाकडून नगर तालुक्यातील जळालेले रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी आधी थकीत वीजबिल भरा, मगच आम्ही रोहित बदलून देऊ अशी मुजोरीची भाषा अधिकारी करत आहेत.
जळलेले रोहित्र बदलून देण्यासंदर्भात मी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता मला देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून तेच उत्तर देण्यात आले.
ही बाब अत्यंत गंभीर व लाजिरवाणी असून तुमच्या सारखा महिन्याचा महिन्याला पगार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही.
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे खूप मोठे नुकसान झाले आहे.तरी देखील महावितरणककडून शेतकऱ्यांची अडवणूक अत्यंत निंदनीय आहे. जर हे थांबले नाही तर भाजपा नगर तालुका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र आंदोलन करेल.