अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव भागातील वीस गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र अपेक्षित पाणीपट्टी योजनेकडे जमा केली जात नाही.
त्यामुळे या योजनेची वीज बिल थकबाकी 6 कोटी 49 लाख 83 हजार 360 रुपयांवर पोहचली आहे. महावितरणने किमान एक वर्षाच्या वीज बिल थकबाकी वसुलीसाठी योजनेचे वीज कनेक्शन तोडले असून
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने गुरुवारी तातडीने संगमनेर पंचायत समितीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी गावांच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पाणीपट्टी वसुली करून वीज बिल भरण्याबाबत विचारविनिमयकरण्यात आला. तळेगाव दिघे प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी नळकनेक्शन धारकांनी पाणीपट्टी व थकबाकी भरावी.
योजने अंतर्गतच्या गावांनी ठरवून दिलेल्या पाणीपट्टीच्या रकमा भरून योजना सुरू राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी केले आहे.