४ जानेवारी २०२५ मुंबई: मागच्या वर्षी आयुर्मान संपलेल्या ५०० एसटी बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या असून, नव्याने ताफ्यात केवळ १०० बसेस येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळासाठी १३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच स्थगिती दिली आहे. या बसेसचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात असून, नव्या बसेस येणार की नाही ? की जुन्या, जीर्ण झालेल्या बसेसमधूनच सर्वसामान्यांना प्रवास करावा लागणार ? असे प्रश्न आता उभे राहिले आहेत.
गेल्या दोन वर्षांत एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल होण्यास अनेक तांत्रिक अडचणी आल्या. परिणामी याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एसटीच्या डिझेल बसेस, इलेक्ट्रिक बसेस आजही बोटावर मोजण्या इतक्याच येत असल्याने प्रवाशांना आजही जुन्या, जीर्ण, मोडक्या बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या ५०० एसटी बसेस स्क्रॅपमध्ये गेल्यानंतर नवीन येणाऱ्या गाड्यांची संख्या फक्त १०० असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
एसटी महामंडळ काही महिन्यांपासून महसूलवाढीसाठी विविध प्रयत्न करत आहे. परंतु मूळ समस्यांकडे महामंडळाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. जुन्या, मोडक्या बसेस राज्यात आणि राज्याबाहेर धावत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर एसटीचे अपघात, एसटी बिघाडाच्या मालिका आजही सुरुच आहेत. राज्यातील प्रत्येक टोकापर्यंत एसटीच्या फेऱ्या पूर्णपणे सुरू नाहीत.
नव्या बसेस गेल्या दोन वर्षांपासून एसटीच्या ताफ्यात दाखल होऊ न शकल्याने राज्यात खासगी बसेसकडे प्रवासी वर्ग हळूहळू वळू लागला आहे. दररोज अंदाजे ५५ लाख प्रवासी एसटीमधून प्रवास करीत आहेत.ही प्रवासी संख्या वाढावी यासाठी मधल्या काळात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत या क्रांतिकारी योजना सुरू करण्यात आल्या. यामधून एसटीला चांगला महसूल प्राप्त होत आहे. यामुळेच अलीकडे कर्मचाऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
सवलतीमुळे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे.याशिवाय इतर खासगी बसेसशी स्पर्धा करताना स्वमालकीच्या पुरेशा बसेस खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. खासगीवाल्यांचे खिसे भरण्याऐवजी महामंडळावर एक रुपयाचेही कर्ज नाही, तर कर्ज काढून सर्व तऱ्हेच्या स्वमालकीच्या बसेस घेण्याचा निर्णय नवीन परिवहन मंत्री घेतील अशी अपेक्षा आहे. – संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.