अहिल्यानगर- मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीला कोठला येथून रविवारी (दि.६ जुलै) दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. ‘लब्बैक या हुसेन… या हुसेन’च्या घोषणा, ठिकठिकाणी सरबतचे वाटप आणि सवारींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. मंगलगेट, पंचपीर चावडी, चौपाटी कांरजा येथून मिरवणूक रात्री ९.४० वाजता दिल्लीगेट बाहेर पडली.
मोहरमनिमित्त कोठला परिसरात सवारींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी रात्री १२ वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला. या वेळी मानाचे पाच टेंबे पेटविण्यात आले होते.

मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी उठली. कत्तलची रात्र मिरवणूक दाळ मंडई, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, पंचपीर चावडी, बांबू गल्ली, रामचंद्र खुंट, इदगाह मैदान मार्गे कोठला येथे रविवारी सकाळी सवारी परत आपल्या जागेवर बसवण्यात आली.
रविवारी दुपारी १२ वाजता कोठला येथील हमामे हुसेन यांची सवारी उठवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कोठला येथून छोटे बारा इमाम (इमामे हुसेन) यांची सवारी हवेली येथे आल्यानंतर मोठे बारा इमाम (इमामे हसन) यांची सवारीदेखील उठविण्यात आली. इमामे हसन-हुसेन या दोन्हींच्या सवाऱ्या हवेली येथून एकत्रित बाहेर पडल्या. मंगल गेट येथे दोन्ही सवारी एकत्र आल्या. रात्री ९.४० वाजता सवारी दिल्लीगेटच्या वेशी बाहेर पडली. रात्री उशीरा परंपरेनुसार सावेडी परिसरातील विहिरीत सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.
चौका-चौकात सरबताचे वाटप
चौका-चौकात भाविकांना सरबतचे वाटप करुन सवारीवर चादर अर्पण करण्यात आली. या हुसेन… या हुसेन… लब्बैक या हुसेनच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. जुना बजारच्या पुढे संध्याकाळी सवारीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांना यावेळी सरबतचे वाटप करण्यात आले.
या मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्यावतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. चौका-चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. संपूर्ण मोहरम मार्गावर पोलिसांनी बॅरिकेटींग करत चोख बंदोबस्त ठेवला होता