ट्विटरचे ‘सीईओ’ पद भूषवणार मुंबईचा पराग

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- ट्विटर या समाजमाध्यम मंचाचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत.

त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉर्सी ट्विटर आणि स्क्वेअर या दोन्हीचे सीईओ म्हणून काम पाहत होते.

२०२० मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाशी करार करण्यापूर्वी ट्विटर स्टेकहोल्डर इलियट मॅनेजमेंटने सीईओ म्हणून जॅक डोर्सीची बदली करण्याची मागणी केली होती.

आता डॉर्सी यांनी आपले पद सोडले आहे. डोर्सी यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती शेअर केली आहे. पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.

ते २०११पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

Ahmednagarlive24 Office