अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. एक मार्च रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते.
त्यानंतर दि. 7 मार्च 2021 रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर गौतम हिरण यांचा पैशासाठी अपहरण करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.
यासंदर्भात,अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक फेडरेशन, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, यांनी हे प्रकरण लावून धरले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी अल्पावधीतच गुन्हेगारांना जेरबंद केले.या प्रकरणात एकंदर पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह खात्याने ऍड उमेशचंद्र यादव-पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश आज जारी केला आहे.ऍड यादव-पाटील यांच्या नियुक्तीमुळे आरोपीना कठोरात कठोर शासन होईल, असा आशावाद श्रीरामपुरातील व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे.