पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार येथे नुकताच उघडकीस आला. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच ही घटना घडली. याप्रकरणी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तीन आरोपी फरार आहेत. आरोपींना तात्काळ अटक करावी, यासाठी काही कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२१) रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान आरोपीने पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन सोहेल हारूण पटेल (वय २८, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव) याला मारहाण केली.
त्यानंतर एमएच १५ ई ४७९५ क्रमांकाच्या मॅजीक टॅम्पोमध्ये टाकून कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेतीच्या प्लॉटमध्ये नेऊन तेथे त्यास लाकडी दांड्याने, चाकुने, लोखंडी खिळे असलेल्या बांबुने दोन्ही हातावर, डोक्यावर, दोन्ही पायावर, अंगावर, ठिकठिकाणी भोसकून दांडक्याने मारहाण करुन त्याला गंभीर जखमी करुन मारुन टाकले.
अशी फिर्याद मयताचा भाऊ शाहरुख हारूण पटेल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मच्छिद्र सोनवणे ऊर्फ मच्छु, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, विकीचा मित्र (नाव माहिती नाही), योगेश जाधव ऊर्फ पोंग्या (सर्व रा. कोपरगाव) या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी घटनास्थळांना भेट दिली असून पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.