अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यातील बोडखेवाडी या ठिकाणी किरकोळ भांडणाच्या कारणावरून गायीच्या गोठ्यात पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला.
भारती शिवाजी दिघे (वय २८ वर्षे) असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
याप्रकरणी खुनाच्या आरोपावरून पती शिवाजी रामनाथ दिघे (वय ३३ वर्षे) याच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बोडखेवाडी याठिकाणी शिवाजी रामनाथ दिघे व भारती शिवाजी दिघे हे पती – पत्नी राहात होते. ते दोघे मंगळवारी सायंकाळी घरासमोरील गोठ्यात गेले होते.
त्यांच्या गायीच्या कासेला सूज आली होती. गायीचे दुध निघत नव्हते, त्यामुळे गायीच्या कासेला बर्फ लावणे गरजेचे असल्याच्या कारणावरून पती- पत्नीत भांडण झाले.
आरोपी पती शिवाजी रामनाथ दिघे याचा राग अनावर होऊन त्याने पत्नी भारती हिच्या डोक्यात दगडाने मारू तिला जिवे ठार मारले.
घटना समजल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार,
पोलीस उपनिरीक्षक टी. आर. पवार यांनी घटनास्थळी भेट देत आरोपी पतीस ताब्यात घेतले. याप्रकरणी महेश जिजाबा वाणी (रा. नान्नज दुमाला) यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार खुनाच्या आरोपावरून पती शिवाजी रामनाथ दिघे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
मयत भारती दिघे हिच्या मृतदेहावर शोकाकूल व तणावपूर्ण वातारणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.