अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- खरीप हंगामात खते, बी-बियाणे याची कमतरता शेतकर्यांना जाणवणार नाही, याची दक्षता जाईल आणि शेतकर्यांच्या उत्पादन वाढीतूनच जिल्ह्याचा जीडीपी वाढेल हे लक्षात घेवून उत्पादन वाढीसाठी एकत्रीत प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे.
कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकर्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्ह्याचा कृषीचा जीडीपी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी खरीप हंगाम-२०२१ च्या अनुषंगाने प्रशासनाने पेरणीपूर्व केलेल्या नियोजनाचा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की, शेतकऱ्यांना खते- बियाणांची अडचण येता कामा नये.
खरीप हंगामात खते- बियाणांचा पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. अडचणीची संभाव्य शक्यता गृहीत धरून जिल्हास्तरासाठी ८ हजार टन युरियाचा बफर स्टॉक करावा. पावसाळी दिवसात आदिवासी परिसरात निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन नियोजन करावे.
खरीप हंगामासाठी सहकारी- राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्षांकाप्रमाणे शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनास दिले. कुकडी प्रकल्पातील जिल्ह्याच्या हक्काचे पाणी जिल्ह्यास मिळेल, त्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि कृषि सहसंचालक बिराजदार यांनी जिल्ह्यातील आगामी खरीप हंगाम नियोजनाची माहीती सादर केली.
जिल्ह्यातील खरीप हंगामाखालील सरासरी क्षेत्र ४ लाख ४८ हजार हेक्टर आहे. मात्र यावर्षी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या संकेतानुसार पाऊस चांगला व वेळेवर झाला,
तर जिल्ह्यात मागील वर्षीप्रमाणे जवळपास खरिपाची १४८ टक्के पेरणी होणे अपेक्षित आहे. कृषी विभागाने ६ लाख ८५ हजार हेक्टरवर खरीप पेरणी होण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली.