अहमदनगर – नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये 90 इच्छुकांपैकी आतापर्यंत तिघांनीच माघार घेतली आहे. तसेच अद्यापपर्यंत 87 जणांचे अर्ज शिल्लक आहेत.
अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर हे काम पाहत आहेत. नगर शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाची आर्थिक संस्था
आणि शंभर वर्षांहून अधिक परंपरा असणार्या नगर बँकेच्या 18 जागांसाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी एकूण 90 वैध उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत.
आज माघारीचा शेवटचा दिवस असून दुपारी तीन नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 15 तारखेला चिन्हाचे वाटप झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे. सत्ताधारी दिवंगत दिलीप गांधी गटा विरोधात बँक बचाव कृती समिती टक्कर देणार आहे.
या तिघांनी अर्ज माघारी घेतले…
यात गेल्या दोन दिवसांत भिंगार छावणी मंडळ मतदारसंघातून अक्षय गोवर्धन बिहाणी आणि सुरेश रतनप्रदास तिवारी तर मनपा आणि भिंगार मतदारसंघातील अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून पोपटराव धोंडीबा साठे यांनी माघार घेतलेली आहे.