अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने मार्चपासून ‘ब्रेक द चैन’ची घोषणा करत कडक निर्बंध लागू केले आहेत.
पोलिसांनीही नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करत १ मार्च ते ४ मे या दोनच महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ४४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी नगर जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८२३ केसेस करत तब्बल २ कोटी १२ लाख ३९ हजार २८९ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असतानाही काही बेफिकीर नागरिक आजही नियमांचे उल्लंघन करत कोरोनाला आमंत्रण देताना दिसत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांसाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे.
तरीही नागरिक घराबाहेर पडल्यानंतर मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनाकारण बाहेर फिरणे, नियमांचे उल्लंघन करून रेस्टॉरंट, बार, दुकाने सुरू ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी अनेक बेफिकीर नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येतात, गर्दी करतात. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.