अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे.
त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे, असा निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पटोले म्हणाले, केंद्र सरकारने ज्यावेळी देशात नोटबंदी आणली, तेव्हा अनेक जण बँकेच्या रांगेत उभे राहिले. या रांगेत असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पण त्याचदरम्यान गोव्यात एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणजेच आता नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस द्या.
जर नोटबंदी फसली, तर मला कोणत्याही चौकात आपण द्याल ती शिक्षा हा प्रधानसेवक घेण्यास तयार आहे. मग आता त्याचं काय झालं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नोटाबंदीनंतर, जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला गेला. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारेल असे सांगितले.
पण माझ्या लक्षात आलं आणि त्याला मी विरोध केला. हे आमचे शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्यासाठी नाही. हा तुमच्या मूठभर लोकांसाठी नोटबंदीसारखा कायदा आहे, असं मी सांगितलं. यावरून माझं आणि त्यांचं आमनेसामने भांडण झालं. असं नाना पटोले यांनी सांगितलं.