अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- पुढील वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभर आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात देशभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत.
यानिमित्त राष्ट्रगीत गायन व त्याचे ऑनलाईन अपलोडिंग करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख व काही कर्मचार्यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गाऊन ते अपलोड करण्यात आले.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे स्मरण म्हणून ‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभर साजरा करण्यात येत आहे. देशवासीयांमध्ये अभिमान आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ऱाष्ट्रगीताशी संलग्न असाच एक कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाने यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित केला आहे.
लोकांनी राष्ट्रगीत गाऊन आपला व्हिडिओ ‘राष्ट्रगान इन’ या संकेतस्थळावर अपलोड करावा अशी यामागील संकल्पना आहे. अनेकांनी गायिलेल्या राष्ट्रगीतांपैकी निवडक राष्ट्रगीत 15 ऑगस्ट 2021 रोजी दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत.
जास्तीत जास्त भारतीयांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक मंत्रालयाने केले आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने लोकांनी आपले राष्ट्रगीत गाऊन रेकॉर्ड करावे आणि त्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी ही संकल्पना आहे.