र Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील प्रत्येक बालकाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने शहरात गुरुवारी बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते तोफखाना आरोग्य केंद्रात बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान नागापूर येथील आरोग्य केंद्रात नगरसेवक तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहानिमित्त नगर शहरातील बालकांना घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका जंतनाशक गोळ्यांचे वाटप करणार आहेत.

महापालिकेच्या वतीने अनेक आरोग्य सुविधा हाती घेण्यात आल्या असून, शहरातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून संपूर्ण शहर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.