अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये रविवार, दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे,
मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.
पक्षकारांनी आपापसांत समझोता ठेवून सामंजस्याने ती प्रकरणे सोडवण्याचे आवाहन न्या. यार्लगड्डा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले आहे.
ज्या नागरिकांना त्यांची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहमदनगर न्यालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे