राहाता न्यायालयात 25 सप्टेबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  कोपरगांव अंतर्गत असलेल्या राहाता तालुका दिवाणी न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या.आदिती आर.नागोरी यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोक अदालतीत दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

ह्या लोकअदालतीचे आभासी पध्दतीद्वारे देखील आयोजन करण्यात आलेले आहे, त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील, तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणाऱ्या लोकअदालती मध्ये बरेच पक्षकार आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.

या लोकअदालतीमध्ये बँका, पतसंस्था, एमएसईबी, बीएसएनएल, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांची रक्कम वसूली व करवसुलीचे प्रकरणे तसेच दिवाणी,फौजदारी, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, कामगार कायदयाखालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे, तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

पक्षकारांनी ही प्रकरणे परस्पर सामंजस्याने निकाली काढावेत. असे आवाहन ही आदिती आर.नागोरी यांनी केले आहे. मागील लोक अदालतीमध्ये जनतेचा भरघोस प्रतिसाद लाभला बँकांनीही कर्ज प्रकरणात मोठ्या प्रमाणात सूट दिल्याने एकूण 5.75 कोटी रूपयांची कर्ज वसूली झाली आहे.

त्याच अनुषंगाने बँका, बीएसएनएल, पतसंस्था व एमएसईबी यांनी यावेळी ही पुढाकार दाखविला आहे. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी राहाता न्यायालयातील तालुका विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office