मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यामुळे माघार घेतली आहे.
काल राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage Drama) झाला असून त्यावर नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी (Khar police)शनिवारी संध्याकाळी अटक केली होती.
मात्र सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम ३५३ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना शनिवारी पोलीस कोठडीत रात्र काढावी लागली आहे. त्यानंतर त्यांना सांताक्रूझच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र खार पोलीस ठाण्याची कोठडी सांताक्रूझ हद्दीत येत असल्याने त्यांची रवानगी सांताक्रूझ इथे करण्यात आली आहे.
तसेच दुसरीकडे उस्मानाबाद मधेही राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले आणि दोन समाजात तेढ निर्माण करून तणावाचे वातावरण निर्माण करीत राज्याचे कायदा सुव्यवस्था बिगडविल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह ४ जणांनी गुन्हा नोंद करण्याची तक्रार दिली आहे.