नवरात्र प्रारंभ ! जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात घटस्थापना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- नगरसंपूर्ण वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण-उत्सवांमध्ये अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे. शरद ऋतूपूर्वी नवरात्र सुरू होत असल्यामुळे याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते.

दरम्यान करोनाच्या संकटाला दूर सारत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भक्तिसागराला उधाण आले आहे. आज नगर शहरासह जिल्ह्यातील देवी मंदिरात विधिवत घटस्थापना झाली.

शिर्डी येथील साईमंदिर, शनीशिंगणापूर मंदिराकडे भाविकांचे पाय वळले होते. दर्शनासाठी संख्येसह अन्य निर्बंध असले तरी प्रार्थनास्थळे खुली झाली, याचा आनंद भाविकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला, तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदा नवरात्र आठच रात्रींचे आहे. यंदाचे नवरात्र 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत असून,

गुरुवारी (दि. 7) घराघरांमध्ये महिला-युवती उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरणात घटस्थापना करणार आहेत. 10 ऑक्टोबरला रविवारी ललिता पंचमी आहे.

12 ऑक्टोबरला महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) आहे. 13 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास आहे, तर 14 ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. दुसर्‍या दिवशी 15 तारखेला दसरा आहे.

Ahmednagarlive24 Office