अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात. भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवादी संघटनांना पत्र लिहून साद घातली आहे.
खा. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले. ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो.
शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच 9 वे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते.
त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था लागू केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.
मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे.
आजही मराठा समाज ह्या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत. माझी परत एकदा नक्षलबंधूंना विनंती आहे.
आपण मराठा समाजाबद्दल जी सहानुभूती दाखवली, त्याबद्दल तुमचा आदरच करतो. परंतु, जर का तुम्ही शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल तर आपण मुख्य प्रवाहात या. कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच.
लोकशाही बाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत.
काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा.