अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर यात सुधारणा होईल, या आशेवर शिवसेना होती.
मात्र आता स्थायी समिती सभापतीच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबतच राहून शिवसेनेला दणका दिला आहे. अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना भाजपने साथ दिल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी म्हणजे २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने साथ दिल्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झालेले आहेत.
तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात या दोन्ही पक्षांनी यश मिळविले आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभापतिपदासाठी नगरसेवक अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
गुरूवारी यासाठी निवडणूक होणार आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ५, भाजपचे ४, तर काँग्रेस व बसपचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत.
मागील वेळी स्थायी समिती सभापती पदापासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले, तशी अवस्था शिवसेनेची नगर शहरात झाली आहे.
महापालिकेत सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागले आहे. राज्यात शिवसेनेसोबत असलेल्या राष्ट्रवादीने नगरमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपला साथ दिल्याने शिवसेनेची ही अडचण झाली आहे.