Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण उत्तर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांतध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारांनुसार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोचण्यासाठी पक्ष कार्य कार्यकारणीचा करण्याचा विस्तार करून पक्षाशी सर्वसामान्य मतदार जोडणीवर भर देण्यात येणार आहे.
पक्षीय पदाचे विकेंद्रीकरण करून सर्व आघाड्या, सेल यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात येणार आहे. शासन पातळीवरील घेण्यात आलेले सर्व निर्णय या कार्यकारणीच्या माध्यमातून सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
या कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, युवक, युवती कार्यकारणी, महिला आघाडी कार्यकारणी, सोशल मीडिया कार्यकारणी, विविध सेलचे प्रतिनिधी यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे गायकवाड व पवार यांनी सांगितले.
कार्यकारणीच्या माध्यमातून ‘निर्धार, नव्या पर्वाचा, घड्याळ तेच वेळ नवी’ हे संकल्पवादी अभियान राबविले जाणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते, स्थानिक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करून या कार्यकारिणीची निवड केली जाणार असल्याचे गायकवाड व पवार यांनी स्पष्ट केले.