अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरीत त्याला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले काही दिवसांपासून सिद्धार्थ हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
12 मे रोजी अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी तानाजी पवार याने आमदार पुत्र आणि त्याच्या साथीदारावर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
तानाजी पवार यांच्या कंपनीकडून आमदार पुत्रावर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात हव्या असलेल्या सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सिद्धार्थ बनसोडे अटक होत नसल्यामुळे आयुक्त कृष्णप्रकाश आणि पोलिसांवर सर्वच थरातून टीका होत होती. कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव असल्याची चर्चा शहरात रंगली होती.
अखेर 15 दिवसानंतर पोलिसांना आमदार पुत्राला अटक करण्यात यश आले आहे. आता त्याच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.