राष्ट्रवादीकडून पाणीप्रश्नाबाबत कर्जत जामखेडला कायम सापत्न वागणूक….?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत जामखेडला पाण्याच्या प्रश्रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. हा इतिहास साक्षीदार आहे.

त्यामुळे याप्रश्रावर विद्यमान लोकप्रतिनिधीला बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने ते याप्रश्नी स्वत: बोलायला टाळत आहेत. अशी टीका प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवारांचे नाव न घेता केली. भूतवडा तलावासह जोडतलाव पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरला आहे.

या जोड तलावाच्या पाण्याचे जलपुजन माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी करणयात आले. यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. शिंदे म्हणाले की, लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेल्या

भूतवडा जोड तलावाच्या कामाला नंतरच्या १५ वर्षात राष्ट्रवादीने निधी न देण्याचे पाप केल्याने हा प्रकल्प १५ वर्ष रखडला होता. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर आपण या कामाला निधी मिळवून काम पुर्ण केले. यामाध्यमातून जूना भूतवडा तलावाची उंची वाढविण्याबरोबर जोड तलावामुळे तलावाची साठवण क्षमता दीडपटने वाढण्यास मदत झाली.

भूतवडा जोड तलावाबरोबरच खर्डा परिसरातील १ कोटी ६८ लाख ३६ हजार रूपये खर्चाच्या अमृतलिंग लघु पाटबंधारे तलावाच्या कामाला देखील नंतर १५ वर्ष निधी मिळाला नाही. १५ वर्षानंतर राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर आपण या कामाला निधी मिळवून काम पुर्ण केले असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.

जामखेड शहरासाठीची उजनीवरून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आपण पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली. मात्र याचे श्रेय मला मिळेल म्हणून, विद्यमान लोकप्रतिनिधींनी तब्बल दोन वर्ष ही योजना प्रलंबीत ठेवली. ही योजना दोन वर्ष प्रलंबीत का ठेवली ? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी देणे गरजेचे आहे.

मात्र याचे उत्तर देण्याचे ते सोईस्कर टाळत आहेत. जामखेडला कुकडीचे पाणी मागितल्यानंतर कुकडी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन झाल्याने पाणी देता येत नसल्याचे तत्कालिन पाटबंधारेमंत्री अजित पवार यांनी सांगून, पाणी देण्याचे टाळले आहे.

मात्र आपल्या मंत्री पदाच्या काळात कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजना आणि जामखेड तालुक्यातील जवळा आणि आगी बंधाऱ्याचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून, कर्जत जामखेड तालुक्याला हक्काचे कुकडीचे पाणी मिळवले. त्याचबरोबर कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली.

आज विद्यमान लोकप्रतिनिधींनी तुकाई उपसा सिंचन योजना गुंडाळुन ठेवली आहे. तर कुकडीचे आर्वतण पाण्यासाठी कर्जत तालुका कायम आसुसलेला ठेवला आहे.

Ahmednagarlive24 Office