अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोना संसर्गाचा दुसरी लाट आटोक्यात आली असतानाच कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएन्टचे काही संशयित रुग्ण सापडल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार, नवी मुंबईसह पालघर आणि रत्नागिरी येथून घेतलेल्या नमुन्यांमध्ये संशयित सार्स-सीओव्ही-२ डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिणामी, खबरदारी म्हणून संबंधित भागातील अनेक नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवले असून हा नवीन व्हेरियंट कितपत धोकादायक आहे, याबाबतचा सध्या आराेग्य विभागाचा अभ्यास सुरु आहे. डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळून आला होता.
हा विषाणू डेल्टा किंवा बीटा 1.617.2 या कोरोना विषाणूमध्ये बदल होऊन तयार झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच व्हेरियंट कारणीभूत होता. उपलब्ध डेटानुसार, हा व्हेरियंट मोनोक्लोनल अँटिबॉडीला निष्क्रीय करतो.
या व्हेरियंटवर अजून अभ्यास केला जात असल्याचे वरिष्ठ अाराेग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, रायगड,सातारा,सांगली,रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. या जिल्ह्यांमधील काही नमुने हे नव्या व्हेरियन्टचे असल्याचा संशय आहे.
यानंतर आणखी काही चाचण्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत, या चाचण्याचे रिपोर्ट अद्याप बाकी असल्याचे आराेग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टवर आरोग्य विभागाचे पूर्ण लक्ष आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान शंभर नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून नमुन्यांची तपासणी सुरू असून त्याचा अभ्यास सुरु असल्याची माहिती राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ तात्याराव लहाने यांनी दिली.