अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे.
यामुळे भंडारदरातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान भंडारदरा, मुळा पाणलोटात अचानक पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरणातील नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. पाणलोटात पावसाचा जोर असल्याने डोंगरदर्यांमधील धबधब्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते.
ओढे-नाल्यांना पूर आला होता. पण काल पावसाचा जोर ओसरल्याने हे दृष्ट्य लोप पावले आहे. आता धरणाकडे येणार्या पाण्याची आवक मंदावली आहे. तसेच मुळा पाणलोटातही पावसाची उघडीप असल्याने नदीतील पाणीपातळी कमी झाली आहे.
सायंकाळी 4011 क्युसेकने मुळा नदी वाहती होती. काल सकाळी मुळा धरणातील पाणीसाठा 11848 दलघफू (45.56टक्के) झाला होता. आज या धरणातील पाणीसाठा 12000 दलघफूच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान शुक्रवारी सकाळी भंडारदरातील पाणीसाठा66.26 दलघफू (60 टक्के) होता. त्यात हळूवार आवक झाल्याने सायकाळी हा साठा 6686 दलघफूवर पोहचला होता. निळवंडेतील पाणीसाठा 25 टक्के झाला आहे.
दरम्यान राज्यात सर्वदूरच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी धरणे भरली आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. यातच नगर जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.