अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- कोरोनाने जसा भारतात धुमाकूळ घातला आहे त्याच पद्धतीने जगातील इतर देशात देखील त्याचा प्रादुर्भाव झाला होता . यात अनेकांचे बळी देखील गेले आहेत.
मात्र इतर देशांनी कोरोनाला आळा घातला आहे. परंतु दुर्दैवाने भारतात यासाठी खूप मोठा कालावधी लागत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने भारतात कोरोनामुळे तब्बल ४२ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
मात्र केंद्र सरकारने हा दावा फेटाळला आहे. केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असून, त्यांनी चुकीच्या माहिती आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे, असे निती आयोगाचे सदस्य व्ही. के पॉल यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कशाच्याआधारावर तयार करण्यात आली?, अशी विचारणा देखील पॉल यांनी केली आहे. दरम्यान, भारतात कोरोनामुळे किती मृत्यू झाले, याची आकडेवारी गोळा करण्यासाठी द न्यूयॉर्क टाइम्सने तज्ज्ञांची मदत घेतली.
भारतातील कोरोना महामारीला या तज्ज्ञांनी तीन भागांत विभागले. यात सामान्य परिस्थिती, वाईट स्थिती आणि अत्यंत वाईट स्थिती असे वर्गीकरण करण्यात आले. त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार, सरकारने जी आकडेवारी जारी केली त्याहून कित्येक पटीने जास्त मृत्यू प्रत्यक्षात कोरोनामुळे झाले आहेत.
देशातील कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा सुद्धा यात विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, ७० कोटी भारतीयांना कोरोनाची लागण झाली, तसेच कोरोनामुळे ४२ लाख भारतीय दगावले असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.