नगरला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अच्युतराव पटवर्धन यांच्यासह अनेक महान लोक नगर मध्ये होते. हे मला माहीत होतं. पण आज या शहरात माफिया राजची चर्चा होत आहे. या माफियाराज बद्दल बोलले जात आहे. माफिया राज बद्दल बोलणं गुन्हा आहे का ? असा सवाल करत नगरमध्ये पोलीस आणि माफियाराज यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप निर्भय बनो सभेला संबोधित करताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला.
अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या वतीने माऊली सभागृह येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वागळे हॉटेल पॅराडाईज येथून निघण्याच्या तयारीत असतानाच तोफखाना व कोतवाली पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांना नोटीस बजावली.
याची माहिती सभेला संबोधित करताना वागळे यांनी नगरकरांना दिली. ते म्हणाले, मी नगरमध्ये येताच पोलिसांनी मला नोटीस देऊन आ.संग्रामभैय्या जगताप यांच्याबाबत बदनामीकारक बोलू नका असे सांगतात. कोण आहेत हे संग्रामभैय्या ? पोलीस या भैय्यांचे हस्तक आहेत का ? असा शब्दात त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.
वागळे म्हणाले, नगर मधील माफिया राज विरुद्ध एकत्रित आवाज नगरकरांनी उठवला पाहिजे. नगरकरांनी गप्प राहू नये. आवश्यकता असल्यास नगर मधील माफिया राज विरोधात मोर्चा काढू. मी पुन्हा येईल. नगरमध्ये पोलीस या माफियांवर कारवाई का करत नाहीत ? इथल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला जातो. पोलिसांसमोरच आरोपीला राजकीय कार्यकर्त्यांकडून पळवून नेले जाते. पोलीस सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अयोध्येत भक्ती, धर्माच्या नावाखाली व्यापार
भाजप सरकारवर यांनी यावेळी जोरदार तोफ डागली. लोकशाहीमध्ये एकाच वेळी रामाची व नथुरामाची भक्ती करता येणार नाही, असे ते म्हणाले. आयोध्येत भक्ती व धर्माच्या नावाखाली व्यापार सुरू असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांनी सत्यासाठी बलिदान केले. त्यामुळे नगरकरांनी सत्यासाठी आग्रही राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. केंद्र व राज्यातील सरकारला खाली खेचा. लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकांनी संघर्षाची तयारी ठेवावी. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल जाब विचारावा, असे ते म्हणाले.
सभेचे प्रास्ताविक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा लोकशाही बचाव मंचाचे निमंत्रक किरण काळे यांनी केले. प्रास्ताविकापूर्वी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सूत्रसंचलन मंचाचे समन्वयक प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या स्वयंसेवक, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नगरकरांची प्रचंड गर्दी
आयोजकांनी ५.३० वाजता सभा सुरू होण्याची घोषणा केली होती. मात्र ५ वाजल्यापासूनच नगरकर सभास्थळी दाखल होत होते. ५.४५ च्या सुमारास सभागृहातील खुर्च्या भरून गेल्या होत्या. ६ वाजता नगरकरांनी एवढी गर्दी केली की लोक पाऱ्यांवर बसले होते. अनेक लोक उभे होते. शेवटी आयोजकांना सभागृहाच्या बाहेर आयत्यावेळी स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. तिथे ही लोकांनी गर्दी करत शेवटपर्यंत सभा पाहिली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सभेचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात होते. हजारोच्या संख्येने लोक ही सभा लाईव्ह पाहत होतो. सभेचे आयोजक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रेक्षागृहात नागरिकां समवेत पायऱ्यांवर बसून सभा ऐकली. विशेष म्हणजे व्यासपीठावर वागळे आणि माजी कुलगुरू डॉ. निमसे दोघेच विराजमान होते.
महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती
सर्वसामान्य नगरकरांचा यावेळी मोठ्या संख्येने उस्फूर्त प्रतिसाद सभेला मिळाला. त्याचबरोबर महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारे काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, माकप, भाकप त्याचबरोबर समविचारी संघटना, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील सभेला उपस्थित होते.