अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- समाजकार्यापायी आमदार निलेश लंके यांना स्वतःच्या कुटूंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीकडून केली जाते. आ. लंके यांचा हा त्याग मोठा आहे. समाजकार्याचं त्यांना वेड लागलं आहे. त्यांच्या जिवन चरित्र कोणी लिहिलं तर मी त्याचा संपूर्ण खर्च देईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त आ. लंके यांनी बुधवारी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी हजारे यांनी लंके यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. हजारे म्हणाले, आज वाढदिवस आहे म्हणून नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या लंके यांना शुभेच्छा आहेत.
राज्यात अनेक आमदार आहेत. मी आ.लंके यांच्या पाठीशी उभा राहतो याचे कारण त्यांचे काम आहे. सामाजिक, राष्ट्रीय भावनेतून ते जे काम करतात ते महत्वाचं आहे. प्रत्येक आमदाराने आ. लंके यांच्याप्रमाणे काम केले तर तो तालुका देशामध्ये उठून दिसेल. आ. लंके यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. त्यांचे चारित्र, आचार, विचार हे शुद्ध आहेत. जिवन निष्कलंक आहे. ते कुटूंबाकडे लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांची पत्नी नेहमीच करते.
त्यांचा हा त्याग आहे. असे काम करायला वेड लागावे लागते. काही लोक अर्धवेडे झोलेेले आहेत. हा माणूस मात्र समाजहितासाठी संपूर्ण वेडा झालेला आहे. जेवण नाही, झोप नाही समाजहितासाठी सारखा प्रवास याचा अनुभव संपूर्ण राज्यातील जनता घेत आहे.
त्यांचे जीवन चरित्र लिहीले गेले तर ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल. चरित्र लिहून प्रसिद्ध करण्यासाठीचा खर्च मी करेल. त्यांच्या पाठीशी माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील असे हजारे यांनी सांगितले. दरम्यान आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदार संघात विविध उपक्रम राबविण्यात आले.