अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे.
यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावात सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
बेजबाबदार नागरिकांची बेफिकीर व स्वच्छतेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांमुळे गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात शासन, प्रशासन व ग्रामपंचायतीला अपयश येत आहे.
त्यामुळे ७ मेपासून ते १३ मेपर्यंत गावातील दवाखाने, मेडिकल, दूध संकलन व पिठाच्या गिरणी (ठरावीक वेळेत) सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
जनता कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय सरपंच आबासाहेब काळे,
उपसरपंच संतोष चव्हाण, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी व ग्रामपंचायत सदस्यांच्या आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना महामारी शहरात आहे,
असे म्हणता म्हणता गावात नव्हे वाडी- वस्त्यांवरच्या उंबऱ्यांपर्यंत येऊन ठेपली आहे. मागील वर्षभरापासून शासन आदेश येईल त्याप्रमाणे जनता त्या आदेशाचे पालन करत आली आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेशीवरच रोखण्यात भावीनिमगावकर अपयशी ठरले आहेत.