अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- नितीन गडकरींच्या या नव्या लेटर बॉम्बमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले आहे.
या पत्रामध्ये राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची तक्रार नितीन गडकरींनी केली आहे. नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.
राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे. यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संताप व्यक्त केला आहे.
ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे असेही गडकरींनी स्पष्ट सांगितले आहे. अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघात वाढतील, असेही गडकरींनी पत्रात नमूद केले आहे.
कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा इशाराही गडकरींनी पत्रातून दिला आहे. पत्रात असा उल्लेख केला गेला आहे की, वाशिम शहराच्या १२ किलोमीटर बायपास रस्त्याचे काम सुरु आहे.
मात्र शिवसेना लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे बायपास आणि त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम थांबले आहे. पत्रामध्ये पुढे सांगितले आहे कीस मालेगाव – रिसोड राष्ट्रीय महगामार्गावर पैनगंगा नदीवरील उंच पुलाचे काम अर्धवट झाले आहे.
हे काम पुर्ण करण्यास अडथळा आणत कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. तसेच वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांमुळे थांबले आहे. यामध्ये मशिनरीची जाळपोळ करण्यात आल्याचा उल्लेखही पत्रामध्ये करण्यात आला आहे.